राजाराम दत्तात्रय ऊर्फ राजा ठाकूर हे प्रामुख्याने भारतीय चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील फोंडा येथे झाला. त्यांनी मास्टर विनायक आणि राजा परांजपे यांचे सहाय्यक म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.‘क्या तराना’, ‘पन्ना’, ‘शिकायत’ या तीन चित्रपटांचे स्वतंत्रपणे संकलन केले.
‘बलिदान’ ,‘जिवाचा सखा’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटांचे संकलनही राजा ठाकूर यांनीच केले. ‘बोलविता धनी’ हा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी ‘रेशमाच्या गाठी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.
राजा ठाकूर यांनी १९५४ च्या सुमारास स्वत:ची चित्रपटसंस्था स्थापन केली. त्यांनी १९५५ मध्ये ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी विनोदी चित्रपट ‘घरचं झालं थोडं’ याची निर्मिती केली. यानंतर त्यांनी ‘राजमान्य राजश्री’, ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘पाहू रे किती वाट’, ‘एकटी’, ‘मुंबईचा जावई’ यासारखे मराठी चित्रपट रसिकांना दिले. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ (१९५५), ‘रंगल्या रात्री अशा’ (१९६२), ‘एकटी’ (१९६८) या चित्रपटासाठी राजा ठाकूर यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटासाठीचा ‘रजतकमल’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
याशिवाय ‘घरकुल’ आणि ‘जावई विकत घेणं आहे’, या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. त्यांनी ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून १९७५ मध्ये ‘जख्मी’ या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. राजा ठाकूर यांचे २८ जुलै १९७५ रोजी पुणे येथे निधन झाले.