घरसंपादकीयदिन विशेषआयनीभवन सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ मेघनाद साहा

आयनीभवन सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ मेघनाद साहा

Subscribe

मेघनाद साहा हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणासाठी केला. खगोल भौतिकीतील या महत्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ आहेत. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १८९३ रोजी डाक्कातील सिओरात्तली (आता बांगला देश) येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन १९१५ मध्ये एम. एस्सी आणि नंतर सापेक्षता सिद्घांत व प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएचडी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून डी. एस्सी. पदवी मिळविली. ते कोलकाता विद्यापीठात भौतिकी विषयाचे खैरा प्राध्यापक (१९२१-२३), पलित प्राध्यापक (१९३८-५२) आणि गुणश्री प्राध्यापक (१९५२-५६) तसेच अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (१९२३-३८) होते.

त्यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला तार्‍यांचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन (विद्युत्भारित अणू) म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते.

- Advertisement -

साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळेसुद्घा घडते, हे त्यांनी सप्रमाण सिद्घ केले. त्यांनी १९२० मध्ये ‘सूर्याच्या वर्णमय आवरणातील आयनीभवन’ या विषयावरील एक निबंध फिलॉसॉफिकल मॅगझीनमध्ये प्रसिद्घ केला. रेडिओ तरंगांचे प्रेषण, ज्योतींचे संवहन, प्रज्योत आणि स्फोटक विक्रियांची रचना यांमधील समस्या सोडविण्याकरिता त्यांचा आयनीभवन सिद्घांत उपयुक्त ठरला आहे. अशा या शास्त्रज्ञाचे १६ फेब्रुवारी १९५६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -