मुंबई शेअर बाजार स्थापना दिन

मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. १४६ वर्षे जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी केली. प्रेमचंद रॉयचंद हे व्यापारी रॉयचंद दीपचंद यांचे पुत्र होते.

मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. १४६ वर्षे जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी केली. प्रेमचंद रॉयचंद हे व्यापारी रॉयचंद दीपचंद यांचे पुत्र होते. सफाईदारपणे इंग्लिश बोलणार्‍या प्रेमचंद यांनी १८४९ मध्ये शेअर ब्रोकर म्हणून कामाला सुरुवात केली. कापूस आणि सोन्याच्या व्यवसायात त्यांनी आपला दबदबा तयार केला.

मुंबई शेअर बाजाराचे जन्मस्थान हे १८५० मध्ये एका वडाच्या झाडाखाली आहे. सध्या हे ठिकाण हार्निमन सर्कल नावाने ओळखले जाते. टाऊन हॉलजवळ वडाच्या झाडाखाली प्रेमचंद रॉयचंद आणि इतर दलाल लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या धंद्यांची दलाली करायचे. मुख्यतः यावेळी कापसाचे सौदे व्हायचे. सुरुवातीला ४ गुजराती आणि एक पारसी हे दलाल होते. या दलालांना बसण्यास अशी विशिष्ट जागा नव्हती. तसेच वेळेचे बंधन आणि कुठले नियमही नव्हते.

हळूहळू या ठिकणी दलालांची संख्या वाढली. त्यामुळे येथे जागा अपुरी पडू लागली. १८७४ च्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होऊन सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे ठरवले आणि त्यानंतर ‘द नेटीव शेअर अ‍ॅन्ड स्टॉक ब्रोकर्स’ही संस्था १८७५ मध्ये स्थापन होऊन व्यवहार सुरू झाले. प्रेमचंद रॉयचंद हे व्यापारी ‘द नेटीव शेअर अ‍ॅन्ड स्टॉक ब्रोकर्स’चे संस्थापक सदस्य होते.

‘द नेटीव शेअर अ‍ॅन्ड स्टॉक ब्रोकर्स’ची सुरुवात २५ शेअर दलालांनी अवघ्या एका रुपयात केली होती. अशा तर्‍हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला. सध्या मुंबई शेअर बाजार हा जगातील ११ व्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे. शेअर बाजार हा एक असा बाजार आहे की ज्या ठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. सुरुवातीला शेअर्सची खरेदी-विक्री तोंडी होत असे, मात्र आता हे सर्व व्यवहार शेअर बाजाराच्या नेटवर्कने जोडलेल्या कॉम्प्युटर्समार्फत होतात.