Eco friendly bappa Competition
घर संपादकीय दिन विशेष संगीतप्रसारक पंडित विष्णू पलुस्कर

संगीतप्रसारक पंडित विष्णू पलुस्कर

Subscribe

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा आज स्मृतिदिन. पंडित विष्णू पलुस्कर हे महाराष्ट्रातील एक थोर संगीतप्रसारक, गायनाचार्य व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १८७२ रोजी कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे वडील दिगंबरपंत हे चांगले कीर्तनकार होते व कुरुंदवाडच्या छोट्या पातीचे राजे दाजीसाहेब यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे राजघराण्यातच विष्णूबुवांचे शिक्षण सुरू झाले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याचे चांगले अंग असल्यामुळे मिरज येथे असलेल्या संगीताचार्य पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे पाठवून संगीतविद्या शिकविण्याचे ठरविण्यात आले. बाळकृष्णबुवा यांच्याकडे त्यांनी 9 वर्षे मन लावून संगीताचा अभ्यास केला. त्यांचा आवाज मेहनतीने अत्यंत गोड, सुरीला व बुलंद झाला होता. पंडित बाळकृष्णबुवांकडून त्यांनी शुद्ध स्वरूपात ग्वाल्हेर गायकी प्राप्त केली. आलाप, बोल उपज व वजनदार ताना या तिन्ही अंगांचा समतोल त्यांच्या गायकीमध्ये साधला होता. ही सर्व विद्या त्यांनी गुरुगृही संपादन केली.
तत्कालीन समाजात संगीतकला व तिचे उपासक यांना मुळीच मान नव्हता. ज्यांना उपजतच संगीताची खास आवड व कलेची नैसर्गिक देणगी असे, ते दूरवर जाऊन संगीतकला शिकत व संगीताच्या सेवेत समाधान मानीत. काही संस्थानांतून काहींना थोडाफार राजाश्रय मिळे; पण बहुतेकांची सांपत्तिक स्थिती चिंताजनकच असे. ह्या सर्व परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून संगीतकलेचे पूर्वीचे वैभव व महत्त्व तिला प्राप्त करून देणे आणि समाजात कलाकाराला मानाचे स्थान मिळवून देणे, हे ध्येय गुरुगृह सोडताना विष्णुबुवांनी डोळ्यांसमोर ठेवले व पुढे आयुष्यभर या ध्येयपूर्तीसाठी निष्ठापूर्वक अखंड परिश्रम केले. अशा या थोर संगीतप्रसारकाचे २१ ऑगस्ट १९३१ रोजी निधन झाले.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -