नारायण देसाई एक भारतीय गांधीवादी लेखक होते. ते महात्मा गांधींचे स्वीय सचिव आणि चरित्रकार महादेव देसाई यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी गुजरातमधील बुलसर (आता वलसाड) येथे झाला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी गांधींच्या विचारांवर आणि जीवनावर अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे बालपण साबरमती आश्रम आणि वर्ध्यातील सेवाग्राममध्ये गेले. ते खरे तर शाळेत गेलेच नव्हते.
पण तरीही एका विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. गुजराती, हिंदी, इंग्लिश आणि बंगाली अशा चार भाषा त्यांना उत्तम बोलता, वाचता, लिहिता येत होत्या. आचार्य विनोबा भावे यांच्या ‘भूदान चळवळी’त त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी भूदान चळवळीचे ‘भूमिपुत्र’ हे मुखपत्र सुरू केले. १९५९ पर्यंत ते त्याचे संपादक म्हणून काम पाहात होते.
जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या संकल्पनेने ते भारले गेले. त्यासाठी ते झोकून देऊन काम करत होते. ‘पीस ब्रिगेड इंटरनॅशनल’ची स्थापना करण्यातही त्यांचा वाटा होता. ‘वॉर रेझिस्टर्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रक्रियेत त्यांचे कार्य मोलाचे ठरले. २००४ सालापासून नारायण देसाईंनी विविध देशांमध्ये जाऊन गांधीजींविषयी ११८ व्याख्याने दिली.
नव्या पिढीला गांधी स्वत:च्या भाषेत समजावून सांगण्याच्या हातोटीमुळे ते लोकप्रिय होते. त्यांनी चार खंडांत तीन हजार पानांचे गांधीजींचे चरित्र गुजरातीत लिहिले. त्याचे अनेक भाषांत अनुवाद झाले. त्यांनी कस्तुरबांच्या जीवनावर इंग्रजीत एक नाटकही लिहिले होते. शांतता आणि अहिंसेच्या कार्यासाठी त्यांना ‘युनेस्को’चा मदनजितसिंग पुरस्कार मिळाला. नारायण देसाई यांचे १५ मार्च २०१५ रोजी निधन झाले.