नारायण सदाशिव मराठे उर्फ केवलानंद सरस्वती हे महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १८७७ रोजी कुलाबा जिल्ह्यातील सुडकोली या गावी झाला. ते ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्मय आणि व्याकरण, न्याय, वेदांत, मीमांसा इत्यादींत पारंगत होते. त्यांचे शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरुगृही झाले.
नव्य-न्यायाचे व शांकर अद्वैत वेदांताचे अध्ययन, १८९५ मध्ये वाई येथे आल्यावर झाले. अध्यात्मविद्येचे अध्ययन प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी झाले. त्यांनी वाई येथे स्वतःची पाठशाळा १९०१ पासून सुरू केली. त्याच पाठशाळेचे ‘प्राज्ञपाठशाळा’ असे नामकरण १९१६ मध्ये केले.
मराठी व संस्कृत भाषेमधील अन्य विषयांवरील बरेच ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. पदार्थविज्ञान, जीवविज्ञान व सामाजिक शास्त्रे यासंबंधी मराठीत प्रसिद्ध झालेले विद्वानांचे ग्रंथ त्यांनी मन:पूर्वक वाचून काढले. हिंदुस्थानचा व जगाचा इतिहास, आधुनिक खगोल व भूगोल यांची उत्कृष्ट माहिती मिळवली. त्यांचा दैनंदिन जीवितक्रम व्रतस्थ व तपस्वी माणसाचा असे. एकांतवास व विद्याव्यासंग यांत कधीही खंड पडला नाही. स्वत:ची सर्व कामे स्वत:च, अत्यंत वक्तशीरपणे करावयाची.
वाणी व शरीर या दोहोंच्या बाबतीत टापटीप व स्वच्छता यांवर त्यांचा फार कटाक्ष होता. त्यांच्या तोंडून कधीही अपशब्द आला नाही. स्वभाव प्रेमळ होता; पण त्यांच्या अत्यंत शुचिर्भूत वागणुकीचा एक प्रकारचा दरारा विद्यार्थ्यांवर असे. त्यांनी लोकांशीही सलोख्याचे संबंध ठेवले. अजातशत्रू या पदवीला ते खर्या अर्थाने प्राप्त झाले.
‘मीमांसादर्शनम’, ‘अद्वैतसिद्धी’चे मराठी भाषांतर, ‘ऐतरेय’ : विषयसूची, ‘कौषितकी ब्राह्मण’ : विषयसूची, ‘तैत्तिरीय मंत्रसूची’, ‘तैत्तिरीय शाखा’ : विषयसूची, ‘सत्याषाढसूत्र’ : विषयसूची, ‘अद्वैतवेदान्तकोश’, ‘मीमांसाकोश’ इत्यादी ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली. अशा या श्रेष्ठ संस्कृत पंडिताचे १ मार्च १९५५ रोजी निधन झाले.