घरसंपादकीयदिन विशेषयुगप्रवर्तक मराठी कादंबरीकार ना. सी. फडके

युगप्रवर्तक मराठी कादंबरीकार ना. सी. फडके

Subscribe

नारायण सीताराम फडके हे युगप्रवर्तक मराठी कादंबरीकार, कथाकार, मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक आणि साहित्य समीक्षक होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी झाला. त्यांचे वडील सीताराम फडके हे वेदान्ती होते. वेदान्तनिदर्शन (१९१३) हा व्यासंगपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. फडक्यांचे प्राथमिक शिक्षण वडूज (जि. नासिक), बार्शी (जि. सोलापूर), पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी, तर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. १९१७ साली ते एम.ए. झाले. तत्पूर्वीच, १९१६ मध्ये न्यू पूना कॉलेजात प्राध्यापक झाले.

‘मेणाचा ठसा’ ही त्यांची पहिली कथा केरळ कोकिळ या मासिकात प्रसिद्ध झाली (१९१२). ‘अल्ला हो अकबर!’ (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर त्यांनी अनेक कथा आणि कादंबर्‍या लिहिल्या. ‘कुलाब्याची दांडी’ (१९२५), ‘जादूगार’ (१९२८), ‘दौलत’ (१९२९), ‘अटकेपार’ (१९३१), ‘निरंजन’ (१९३२) ‘उद्धार’ (१९३५), ‘प्रवासी’ (१९३७), ‘अखेरचं बंड’ (आवृ. दुसरी, १९४४) या महत्त्वाच्या कादंबर्‍यांतून प्रणयरम्यतेला त्यांनी गंभीर विषयांची जोड दिली. आणि महाराष्ट्रातील काही असामान्य व्यक्तिमत्त्वांचे दर्शन त्यांतून घडविले. गेल्या पन्नास-साठ वर्षांतील महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा उपयोग त्यांनी आपल्या पुढील कादंबर्‍यांतून पार्श्वभूमीसाठी करून घेतला.

- Advertisement -

‘बेचाळीसचे प्रतिसरकार’ (झंझावात, १९४८), ‘काश्मीरचे स्वातंत्र्योत्तर राजकारण’ (जेहम, १९४८), ‘गोवामुक्तीचे आंदोलन’ (उजाडलं ! पण सूर्य कुठे आहे? १९५०) अशा काही कादंबर्‍या त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. त्यांच्या काही कादंबर्‍यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत. ‘कलंक शोभा’ (१९३३) या त्यांच्या कादंबरीवरून मराठी चित्रपटही काढण्यात आला होता. फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले आहेत. अशा या महान साहित्यिकाचे २२ ऑक्टोबर १९७८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -