समीक्षक, प्रभावी वक्ते नरहर कुरुंदकर

नरहर कुरुंदकर हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर याठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले.‘जागर’, ‘रूपवेध’, ‘मनुस्मृती’, ‘शिवरात्र’, ‘अभयारण्य’, ‘वाटा तुझ्या माझ्या’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.

आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्रात ज्या साहित्यिक आणि विचारवंतांनी महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व केले, त्यामध्ये कुरुंदकरांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांनी लिहिलेले उतारे, निबंध, लेख हे सोशल मीडियावर सातत्याने दिसत राहतात. किशोरवयीन अवस्थेतच ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात उतरले होते. त्यांच्यावर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. १९४८ मध्ये त्यांना अटकदेखील झाली होती. सुटकेनंतर पुन्हा ते चळवळीत उतरले.

जेव्हा १९५६ ला बा. सी. मर्ढेकर यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या समीक्षणाची लेखमाला ‘सत्यकथा’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली तेव्हा ते महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. त्यांनंतर मुंबईच्या मराठी साहित्य संघाने त्यांना सौंदर्यशास्त्रावर व्याख्यानासाठी बोलवले होते. गमतीचा भाग म्हणजे कुरुंदकर तेव्हा इंटर (आताचं बारावी) पास नव्हते तेव्हा त्यांची पुस्तके बीएला अभ्यासक्रमाला होती.

ते मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते, ते बीए पास नव्हते त्याआधी ते मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर होते, एम. ए. पास झाले नव्हते त्याआधी त्यांचा रिचर्ड्सची कलामीमांसा हा संशोधनावर आधारित असलेला ग्रंथ आला होता. त्यावेळी ते नांदेडच्या प्रतिभा निकेतन शाळेत प्राथमिक शिक्षक होते. एम. ए. पूर्ण केल्यानंतर १९६३ मध्ये ते पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. १९७७ मध्ये ते पीपल्स कॉलेजचे प्राचार्य झाले. पुढे त्यांना राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कारदेखील मिळाला. अशा या प्रतिभावान लेखकाचे १० फेब्रुवारी १९८२ रोजी निधन झाले.