हॉकीचे सार्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून २००२ पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो.आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखविणार्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणार्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
आजच्याच दिवशी १९०५ रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील सोमेश्वर दत्त सिंग हे आर्मीत असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. वडिलांच्या निवृत्तीनंतर १९२२ साली वयाच्या १६ व्या वर्षी ध्यानचंद स्वत: आर्मीत दाखल झाले. त्यावेळी ते आर्मीच्या रेजिमेंटमध्ये होणार्या हॉकी सामन्यात खेळताना त्यांचे हॉकीतील कौशल्य पाहून मेजर बाले तिवारी यांनी त्यांना हॉकीमधील बारकावे शिकवले.
ते त्यांचे हॉकीमधील गुरू होते. पुढे मेजर ध्यानचंद हे हॉकीमध्ये इतके रमले की हॉकी म्हणजे त्यांचा जीव की प्राण ठरला. १९२२ ते १९२६ या कालावधीत त्यांनी रेजिमेंटच्या विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवले. हॉकीतील त्यांच्या कर्तृत्वामुळे न्यूझीलंड दौर्यावर जाणार्या इंडियन आर्मीच्या संघात त्यांची निवड झाली हा दौरा त्यांनी गाजवला. या दौर्यात त्यांनी आपल्या संघाला १८ विजय मिळवून दिले. केवळ भारतच नाही तर जगातील अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडले होते.