घरसंपादकीयदिन विशेषकादंबरीकार शंकरराव खरात

कादंबरीकार शंकरराव खरात

Subscribe

शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. त्यांचा जन्म 11 जुलै 1921 रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे एका दलित कुटुंबात झाला. पूर्वीच्या काळी असलेली विषमता त्यांच्याही पाचवीला पुजलेली होती. ते दलित असल्याने त्यांना अस्पृश्यतेचे चटके खावे लागले होते. अस्पृश्यतेच्या सावटाखाली असतानाही ते गावातील शाळेत शिकू लागले. गावात चौथीपर्यंत शाळा होती, जी कलेश्वराच्या मंदिरात भरायची. येथूनच त्यांनी आपले चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणाची आवड असल्याने मॅट्रिकचे (अकरावी) शिक्षण घेण्यासाठी ते औंधला गेले, तर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी आपले बी.ए.पूर्ण केले. त्यांनी १९४७-४८ साली वकिलीचे शिक्षण पूर्ण करत वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दलित व गरिबांवरचा अन्याय त्यांना पाहवत नव्हता. त्यांच्यावरील खोटे खटले ते मोफत लढत असत. इ.स. 1984 साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

- Advertisement -

शंकररावांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक प्रभाव होता. त्यांच्या प्रभावामुळे त्यांना समाजकार्याची आवड निर्माण झाली. आपली आवड आणि आपल्या व्यवसायाची सांगड घालत, ते वकिली व्यवसायामार्फत समाजसेवा करू लागले. याच काळात त्यांचा ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, विमुक्त भटक्यांच्या संघटनांशी संपर्क आला. उपेक्षितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अशा संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढत गेला. त्यानंतर १९५६-५७ मध्ये ‘नवयुग’दिवाळी अंकात त्यांची ‘सतूची पडिक जमीन’ ही पहिली कथा प्रकाशित झाली.

आपल्या पहिल्याच कथेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांची १९५७-५८ साली ‘माणुसकीची हाक’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘आज इथं तर उद्या तिथं,’ ‘आडगावचे पाणी,’ ‘गावचा टिनपोल गुरुजी,’ ‘गाव-शीव,’ ‘झोपडपट्टी,’ ‘टिटवीचा फेरा,’ ‘तडीपार,’ ‘दौण्डी,’ ‘फूटपाथ नंबर १,’ ‘बारा बलुतेदार,’ ‘मसालेदार गेस्ट हाऊस,’ ‘माझं नाव,’ ‘सांगावा,’ ‘सुटका,’ ‘हातभट्टी’इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली, तर ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र लिहिले. अशा या प्रतिभावान कादंबरीकाराचे 9 एप्रिल २००१ रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -