प्रसिद्ध कथा-कादंबरीकार वि. स. खांडेकर

विष्णु सखाराम खांडेकर हे प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगली याठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे इंटर आर्ट्सपर्यंत झाले. १९२० मध्ये त्यांनी शिरोड्याच्या ट्युटोरिअल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक या पदावर काम केले. खांडेकरांचे लेखन १९१९ पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी ‘कुमार’ या टोपण नावाने कविता व ‘आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले.‘घर कुणाचे’ ही त्यांची पहिली लघुकथा १९२३ मध्ये महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली. ‘नवमल्लिका’(१९२९) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ‘हृदयाची हाक’(१९३०) ही त्यांची पहिली कादंबरी. ‘वायुलहरी’(१९३६) हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह.

खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात १५ कादंबर्‍या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक यांशिवाय काही चरित्रात्मक / समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिलेल्या आहेत. ‘नवमल्लिका’, ‘पाकळ्या’(१९३९), ‘समाधीवरली फुले’(१९३९), ‘नवा प्रात:काल’(१९३९) हे त्यांचे कथासंग्रह.

तर ‘हृदयाची हाक’ ‘कांचनमृग’(१९३१),‘उल्का’(१९३४), ‘दोन मने’(१९३८), ‘क्रौंचवध’(१९४२), ‘अश्रु’(१९५४),‘ययाति’(१९५९) आणि ‘अमृतवेल’(१९६७). या त्यांच्या कादंबर्‍या. ‘धर्मपत्नी’ हा तेलुगू चित्रपट व ‘बडी माँ’,‘दानापानी’ यांसारखे हिंदी चित्रपट त्यांच्याच पटकथांवर आधारलेले होते. खांडेकरांच्या ‘ययाति’ या कादंबरीला साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. १९६८ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. अशा या प्रसिद्ध लेखकाचे २ सप्टेंबर १९७६ रोजी निधन झाले.