घरसंपादकीयदिन विशेषनाटककार, लेखक विजय तेंडुलकर

नाटककार, लेखक विजय तेंडुलकर

Subscribe

विजय तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन. विजय तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वत: लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा.मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातून तेंडुलकरांची घडण होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते.

लेखनदृष्ठ्या ‘गृहस्थ’ हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. याचेच ‘कावळ्यांची शाळा’ या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले, मात्र ‘श्रीमंत’ हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्‍या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला.

- Advertisement -

‘सखाराम बाईंडर’ मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. ‘माणूस नावाचे बेट’, ‘मधल्या भिंती’, ‘सरी गं सरी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ही नाटके तसेच ‘छिन्न’ ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘आक्रीत’, ‘उंबरठा’, ‘अर्धसत्य’, ‘आक्रोश’, ‘आघात’, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. अशा या प्रतिभावान लेखकाचे १९ मे २००८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -