शरच्चंद्र मुक्तिबोध हे मराठी कवी, कादंबरीकार आणि निबंधकार होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९२१ रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे शिक्षण उज्जैन व इंदूर येथे एम.ए. एलएलबीपर्यंत झाले. त्यानंतर माध्यमिक शाळांतून अध्यापन, वकिली, नागपूरच्या प्रकाश मासिकाचे सहसंपादन अशी विविध कामे केली. १९५७ पासून नागपूरच्या ‘नागपूर महाविद्यालया’त मराठीचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले.
आपल्या लेखनाच्या पूर्वपर्वातच शरच्चंद्र मुक्तिबोधांनी कविता, कादंबरी आणि समीक्षा या प्रांतात आपला अधिकार प्रस्थापित केला होता. ह्या तिन्ही वाङ्मय प्रकारात मुक्तिबोध एकाच वेळी लेखन करीत होते. नवी मळवाट (१९४९) व यात्रिक (१९५७) हे मुक्तिबोधांचे काव्यसंग्रह. क्षिप्रा (१९५४), सरहद (१९६२) आणि जन हे वोळतु जेथे (१९६९) ह्या त्यांच्या कादंबर्या आहेत.
कविता आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारांसोबतच मुक्तिबोधांनी समीक्षात्मक/वैचारिक प्रकृतीचेही लेखन ‘काही निबंध’ आणि ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’ या दोन पुस्तकांच्या माध्यमातून केले आहे. प्राचीन भारतीय साहित्यातील रससिद्धान्त आणि मर्ढेकरांचा लयसिद्धान्त या दोन्ही वैचारिक प्रवाहांना खोडून काढत मुक्तिबोधांनी मानुषतेचा सिद्धान्त ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’ या ग्रंथातून मांडला आहे.
कविता, कादंबरी आणि समीक्षेच्या क्षेत्रात आपल्या नावाचा अमीट ठसा उमटविणार्या या प्रतिभावंत लेखकाला त्यांच्या ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’ या समीक्षणात्मक ग्रंथासाठी १९७९ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. समष्टीला प्राधान्य देणार्या मुक्तिबोधांनी मात्र स्वत:ला वाङ्मयीन संस्था, संमेलने, सोहळे यापासून कटाक्षाने दूर ठेवले. शरच्चंद्र मुक्तिबोध यांचे २ नोव्हेंबर १९८४ रोजी निधन झाले.