घर संपादकीय दिन विशेष कवी, गीतकार वा. रा. कांत

कवी, गीतकार वा. रा. कांत

Subscribe

कविवर्य वा. रा. कांत यांचा आज स्मृतिदिन. वामन रामराव कांत हे मराठी कवी, गीतकार होते. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९१३ रोजी नांदेड येथे झाला. वा. रा. कांत या नावाने ते लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. त्यांचे इंटरपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे झाले. त्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांनी विपुल कवितालेखन केले. स्वत:च्याच कवितेवर प्रयोग करीत असताना आपल्या सहा दशकांच्या साहित्यसेवेत त्यांनी नाट्यकाव्य-द्विदलार्थी कविता ‘दोनूली’ हा नवा काव्यप्रकार मराठी साहित्यात आणला. या सहा दशकांच्या काव्यप्रवासात त्यांच्या कवितेने आपली अनेक रूपे मराठी रसिकांसमोर सादर केली. त्यांचे स्वत:च्याच कवितेशी एक अतूट नाते होते. सर्जनशील, चैतन्यशील, संवेदनशील व नित्य नवा उन्मेष प्रकट करणारी त्यांची कविता त्यांच्या वयाच्या अखेरी अखेरीस मृत्यूशी संवाद करू लागली होती. या काळात त्यांची जीवनदृष्टीच अगदी निराळी होऊन गेली होती. मृत्यूविषयी प्रत्येकाच्या मनात खोलवर भीती दडलेली असते.

आपल्याला माहीत आहे की, मृत्यू अंतिम अन् अटळ आहे. परंतु त्यांच्या कवितेत याच मृत्यूविषयीचा अनुभव गूढ व गहिरा होतो व वाचकांना अचंबित करून टाकतो. त्यांच्या कवितेत देशभक्ती, क्रांती, प्रेम, विरह, निसर्ग, सौंदर्य या अनुभूतींबरोबरच अखेरच्या काळातील कवितांमधून मृत्यूविषयीचे चिंतन अधिक प्रगल्भ आणि गहिरे जाणवते. त्यांच्या जीवनातील अखेर अखेरच्या कवितेतून उतरलेल्या मृत्यूविषयीच्या उल्लेखाने एक प्रकारचा अचंबित व स्तंभित करणारा भाव स्पर्शून जातो. अशा या महान कविवर्याचे 8 सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -