पु. ल. देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईतील गावदेवी येथे झाला. पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एलएल.बी. झाले आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.
१९३७ पासून नभोवाणीवर पु. ल. देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या ‘पैजार’ या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु. लं. नी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र – भट्या नागपूरकर – अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याचदरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये ‘जिन आणि गंगाकुमारी’ ही लघुकथा लिहिली. १९४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते.
१९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. ‘वंदे मातरम्, ‘दूधभात’ आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पु. लं. चे होते. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे १२ जून २००० रोजी निधन झाले.