चतुरस्त्र साहित्यिक, नाटककार आचार्य अत्रे

Acharya Atre

प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड (जिल्हा पुणे) या गावी झाला. सासवड, पुणे, मुंबई व लंडन या ठिकाणी बी. ए., बी. टी., टी. डी. पर्यंत त्यांचे शिक्षण झाले. नंतर पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. १९३३ पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. १९४० मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते राहिले.

याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावसायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले. प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी त्यांनी काव्यलेखन केले. ‘झेंडूची फुले’ (१९२५) हा त्यांच्या विनोदी व विडंबन-कवितांचा संग्रह. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता ‘गीतगंगा’ (१९३५) या संग्रहात आहे. त्यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड १९३३ ते १९६० हा होय. ‘साष्टांग नमस्कार’ (१९३३), ‘भ्रमाचा भोपळा’ (१९३५) व ‘लग्नाची बेडी’ (१९३६) ही त्यांपैकी काही लोकप्रिय नाटके होत.

‘घराबाहेर’ (१९३४) व ‘उद्याचा संसार’ (१९३६) ही त्यांची विशेष गंभीर व सामाजिक समस्यात्मक नाटके आहेत. अवकळलेल्या मराठी रंगभूमीचा लोकाश्रय टिकवून ठेवण्यात अत्र्यांची नाटके यशस्वी झाली. विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो. ‘महात्मा फुले’ (१९५८), ‘सूर्यास्त’ (१९६४), ‘समाधीवरील अश्रू’ (१९५६), ‘केल्याने देशाटन’ (१९६१), ‘अत्रे उवाच’(१९३७), ‘ललित वा’ (१९४४), ‘हशा आणि टाळ्या’ (१९५८) ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होत. आचार्य अत्रे यांचे १३ जून १९६९ रोजी निधन झाले.