डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे हे मराठीतील निबंधकार व विचारवंत म्हणून ओळखले जात. त्यांचा जन्म १० जून १९०४ रोजी पुणे येथे झाला. लहानपणी मनात वैराग्यभावना निर्माण झाल्यामुळे त्यांनी हिमालयात जाऊन जपाचा आणि ध्यानाचा प्रयोग केला, पण त्यातले वैयर्थ्य जाणवल्याने लौकिकात परतून ते १९२४ मध्ये मॅट्रिक झाले. याच वर्षी त्यांचा प्रा. श्री. म. तथा बापूसाहेब माटे यांच्याशी परिचय झाला; तो त्यांच्या आयुष्याला वळण लावणारा, संस्कार करणारा ठरला.
१९२८ मध्ये स. प. महाविद्यालयातून बी. ए. झाल्यावर ते नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करू लागले. त्यानंतर १९३१ मध्ये ते एम. ए. झाले. १९३१ मध्ये सहस्रबुद्धे यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकातून कथालेखनाला आरंभ केला. १९३४ मध्ये त्यांच्या ‘लपलेले खडक’ या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन झाले. १९३३ मध्ये त्यांचे पहिले नाटक ‘सत्याचे वाली’ हे प्रसिद्ध झाले आणि दुसरे नाटक ‘वधू संशोधन’ १९३७ मध्ये प्रसिद्ध झाले.
याच सुमारास हिंदूंच्या समाजरचनाशास्त्रावरचा गो.म.जोशींचा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. प्राचीन हिंदू समाजाला स्मृतिकारांनी दिलेली शिकवण आजच्या काळात निरुपयोगी असून तीत आमूलाग्र बदलाची गरज त्यांना जाणवली. लोकांच्या आचार-विचारांतील भ्रम दूर करण्याच्या उद्देशाने सूक्ष्म आणि दीर्घ अभ्यासांती त्यांनी उद्योगप्रधान ‘विज्ञानप्रणीत समाजरचने’च्या प्रयोगावर भर दिला.
भोवतालच्या समाजातील धर्मादी व्यावहारिक प्रश्न, समोरची आव्हाने तपासून आणि विज्ञानाच्या मर्यादा ध्यानी घेत त्यांनी नवे चिंतन मांडले. ‘माझे चिंतन’ हे त्यांचे खूप जागलेले पुस्तक आहे. आपल्या १९३६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘विज्ञानप्रणीत समाजरचना’ या ग्रंथातून व्यक्तिस्वातंत्र्याचे माहात्म्य सांभाळत समाजकल्याणासाठीचा नवा मार्ग त्यांनी दाखवला. अशा या थोर विचारवंताचे ४ मार्च १९८५ रोजी निधन झाले.