केशवराव त्र्यंबक दाते यांचा आज स्मृतिदिन. केशवराव दाते हे मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट आणि नाट्यशिक्षक होते. त्यांचा जन्म २४ सप्टेंबर १८८९ रोजी रत्नागिरीतील आडिवरे येथे झाला. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यानंतर चरितार्थासाठी केशवरावांनी मुंबई गाठली व तेथे सुरुवातीला त्यांनी कंपाऊंडर म्हणून काम केले. त्या काळात महाराष्ट्र नाटक मंडळींची काही नाटके पाहिल्यानंतर नट होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. एका हौशी नाट्यसंस्थेच्या झुंजारराव नाटकातील सारजेची भूमिका हीच केशवरावांची पहिली भूमिका. पुढे एका हितचिंतकाच्या मध्यस्थीने त्यांनी १९०७ मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश केला.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘कीचकवध’ या नाटकात कीचकाची पत्नी रत्नप्रभा हिची भूमिका करण्याची संधी केशवरावांना लाभली (१९०८). महाराष्ट्र नाटक मंडळीच्या नाटकांत केशवरावांनी काही स्त्रीभूमिका केल्यानंतर ते नायकाच्या भूमिका करू लागले. ‘प्रेमसंन्यास’ नाटकातील जयंत (१९१२), ‘सत्वपरीक्षा’ नाटकातील हरिश्चंद्र (१९१४), ‘पुण्यप्रभाव’ नाटकातील वृंदावन (१९१६) आणि ‘विचित्रलीला’ नाटकातील विचित्र (१९१६) या त्यांपैकी काही ठळक भूमिका होत. महाराष्ट्र नाटक मंडळीतून निवृत्त झाल्यानंतर १९२० ते १९३४ या काळात केशवरावांनी समर्थ नाटक मंडळी व नाट्यमन्वंतर या संस्थांच्या नाटकांत भूमिका केल्या.
केशवराव हे उत्कृष्ट नाट्यशिक्षकही होते. नट आणि नाट्यशिक्षक अशा दोन्ही भूमिका करून त्यांनी नाट्यमन्वंतर या प्रयोगशील नाट्यसंस्थेला कलात्मक यश आणि व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून दिली. बोलपटांच्या आगमनानंतर केशवरावांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. येथेही चित्रपटातील त्यांची भूमिका बरीच लोकप्रिय झाली होती. अशा या प्रख्यात नाट्यशिक्षकाचे १३ सप्टेंबर १९७१ रोजी निधन झाले.