गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर हे ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी सिंधुदूर्ग याठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत.
अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. विंदांचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतन पण कधी स्वीकारले नाही.
त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व व्युत्पन्न, बहुश्रुत आणि अनेकविध संस्कारांनी संपन्न होते. ‘परंपरे’चा स्वीकार करून ‘नवते’च्या दिशा शोधणे, हा करंदीकरांच्या जाणिवेचा स्वभाव होता. विंदांच्या ‘स्वेदगंगा’ , ‘मृद्गंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’ आणि ‘अष्टदर्शने’ या ६ कवितासंग्रहांत मिळून साडेचारशेच्या आसपास कविता समाविष्ट आहेत. विंदांच्या प्रारंभीच्या अनेक कवितांवर मार्क्सवादाचा निश्चित स्वरूपाचा संस्कार झालेला आहे. ‘स्वेदगंगा’, ‘मुंबई’, ‘लोकशक्ति ही’, ‘विश्वरूप’, ‘मजूर’ इत्यादी कवितांमध्ये वक्तृत्वपूर्णता आहे.
‘माझ्या मना, बन दगड’, ‘ती जनता अमर आहे!’, ‘दातापासून दाताकडे’ या विंदांच्या प्रसिद्ध आणि परिणामकारक कविता आहेत. नंतरच्या काळात विचारप्रणालींच्या मर्यादा जाणवल्यावर समाजातील सामान्य माणसाविषयीची, उपेक्षितांविषयीची त्यांची आस्था आणि त्यांच्या चांगुलपणाविषयीचा त्यांचा विश्वास कधीही क्षीण झालेला दिसत नाही. अशा या प्रतिभावान कवीचे १४ मार्च २०१० रोजी निधन झाले.