साम्यवादी क्रांतीचे प्रणेते कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स यांचा आज स्मृतिदिन. कार्ल मार्क्स हे साम्यवादी क्रांतीचे कृतिशील पुरस्कर्ते, समाजशास्त्रज्ञ, समाजवादी विचारसरणीचे प्रणेते होते. त्यांचा जन्म ५ मे १८१८ रोजी पश्चिम जर्मनीतील र्हाइनलँड या प्रांतातील ट्रीर शहरात झाला. त्यांचे वडील-हाईनलँड येथे वकिलीचा व्यवसाय करीत असत. बॉन विद्यापीठात विधी शाखेची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळविली.
मार्क्स यांचा सामाजिक चळवळीवरील प्रभाव अतुलनीय आहे. मार्क्स स्वत: एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. जर्मनीतील जेना विद्यापीठामध्ये कायदा आणि तत्वज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर मार्क्स यांनी पत्रकार म्हणून काम सुरू केले. त्यांनी १८४८ रोजी कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घातला. फ्रेडरिच एन्गेल्स यांच्या सहकार्याने लिहिलेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोत त्यांनी कामगार-मजूर वर्गाने क्रांती करून कम्युनिस्ट समाज स्थापन करावा असा विचार मांडला. मार्क्स यांनी मानवाचा उत्पादन व पुनरुत्पादनाचा व्यवहार, त्यातील उत्पादनशक्ती व उत्पादनसंबंध यांचे द्वंद्वात्मक नाते यांच्या आधारे इतिहासाचा तसेच त्याच्या काळातील वर्तमानाचा अभ्यास केला. या अभ्यासातूनच त्यांनी निष्कर्ष काढला की मानवी इतिहास हा वर्गलढ्याचा इतिहास आहे. उत्पादनसाधनांवरची भांडवली खासगी मालकी हे आजच्या सर्व प्रश्नांचे मूळ आहे. आपल्या जाणिवांवरून आपले अस्तित्व ठरत नसून आपल्या अस्तित्वाचा आपल्या जाणिवांवर निर्णायक प्रभाव पडतो, असे मार्क्स म्हणतात. आपण राहत असलेल्या जगाचे खरे स्वरूप श्रमिकांनी समजावून घेतले पाहिजे. आपल्या शोषणाची जाणीव त्यांना झाली पाहिजे, असे मार्क्स म्हणतात. अशा या महान साम्यवादी क्रांतीच्या प्रणेत्याचे १४ मार्च १८८३ रोजी निधन झाले.