Homeसंपादकीयदिन विशेषRobert Frost : अमेरिकेचा प्रातिनिधिक कवी रॉबर्ट फ्रॉस्ट

Robert Frost : अमेरिकेचा प्रातिनिधिक कवी रॉबर्ट फ्रॉस्ट

Subscribe

रॉबर्ट फ्रॉस्ट हा विख्यात अमेरिकन कवी होता. त्याचा जन्म २६ मार्च १८७४ रोजी सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाला. त्याचे माध्यमिक शिक्षण लॉरेन्स येथे झाले. १८९७ मध्ये त्याने हार्व्हर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतु तेथे दोन वर्षे राहिल्यानंतर तो पुन्हा लॉरेन्सला परतला.

त्यानंतर अनेक प्रकारच्या नोकर्‍या केल्यावर डेरी, न्यू हँपशर येथे आपल्या आजोबांची शेतीवाडी त्याने काही काळ पाहिली. तेथील एका शिक्षणसंस्थेत शिक्षक म्हणूनही काम केले. डेरी येथील वास्तव्यात फ्रॉस्टने एमर्सन वाचला. त्याच्या साहित्याचा फ्रॉस्टच्या मनावर खोल संस्कार झाला. डेरी येथील निसर्गात त्याने उत्कट रस घेतला. कविता केल्या. १९१२ मध्ये तो इंग्लंडला आला.

अ बॉइज विल (१९१३) आणि नॉर्थ ऑफ बॉस्टन (१९१४) हे त्याचे पहिले दोन काव्यसंग्रह इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाले. १९१५ मध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर मुख्यत: शेती करणे आणि निरनिराळ्या शिक्षणसंस्थांतून शिकविणे हे व्यवसाय त्याने केले. शेतकामाने त्याला त्याच्या काव्याचे विषय पुरवले इतकेच नव्हे, तर त्याच्या काव्याचे स्वरूपही सिद्ध केले. कविता ही कुदळ, फावडे ह्या अवजारांसारखी चोख आणि सरळसोट असावी, असे तो म्हणे.

लाँगफेलो व वॉल्ट व्हिटमन या थोर अमेरिकन कवींनंतर अखिल अमेरिकेचा प्रातिनिधिक कवी अशी मान्यता फ्रॉस्टला मिळाली. अमेरिकेतील विख्यात वाङ्मयीन पुलीट्झर पारितोषिक त्याला चार वेळा मिळाले. जॉन केनेडी ह्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यानिमित्त झालेल्या जाहीर समारंभप्रसंगी प्रारंभीचे शुभचिंतन करण्याचा अपूर्व मान रॉबर्ट फ्रॉस्टला देण्यात आला. रॉबर्ट फ्रॉस्ट याचे २९ जानेवारी १९६३ रोजी बॉस्टन येथे निधन झाले.