डिझेल इंजिनचे जनक रूडोल्फ डिझेल

रूडोल्फ डिझेल हे जर्मन तंत्रज्ञ, डिझेल इंजिनचे जनक, व्यवसायाने यांत्रिक अभियंते होते. त्यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे झाला. त्यांचे शिक्षण आऊग्जबर्ग येथील रॉयल कंट्री ट्रेड स्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी स्वित्झर्लंडमधील एका कारखान्यात उमेदवारी करून अभियांत्रिकीतील व्यावहारिक ज्ञान मिळविले. १८८० मध्ये उच्चतम श्रेणीत पदवी प्राप्त करून ते पॅरिसला परत गेले. त्यांनी म्यूनिक येथील एका प्राध्यापकासोबत काम करून वातानुकूलित यंत्रणा व बर्फाच्या कारखान्याची रचना करण्याचे काम हाती घेतले.

तेथे कार्यरत असताना त्यांनी अनेक साधन-सामुग्रींची पेटंट मिळविली. त्यांनी ऑगस्ट १८९२ मध्ये बर्लिन येथील जर्मन रेश कार्यालयातून डिझेल इंजिनचे पेटंट मिळविले. त्यावेळी इंजिनाच्या रचनेत विविध प्रकारचे बदल घडवून आणण्यात आले. तसेच त्या इंजिनात वापरल्या जाणार्‍या इंधनामुळे जास्तीत जास्त गतिक्षमता असणारे इंजिन तयार व्हावे म्हणून डिझेल सतत प्रयत्नशील राहिले. त्यांनी या इंजिनात पेट्रोल, केरोसीन, वनस्पतिज तेले इत्यादी इंधनांचे प्रयोगदेखील करून पाहिले आणि त्या विविध प्रयोगांत निरनिराळ्या कार्यक्षमतेच्या इंजिनची निर्मिती होत गेली.

१८९७ मध्ये संपीडित (कॉम्प्रेस्ड) हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरीत्या तयार केले. हे इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलिंडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, चार धावांचे, जड, दणकट, मंदगतीचे परंतु उच्च औष्णिक कार्य क्षमतेचे होते. अशा या उद्यमशील अभियंत्याचे २९ सप्टेंबर १९१३ रोजी निधन झाले.