रुडयार्ड किपलिंग हे विख्यात इंग्रज साहित्यिक, लेखक व कवी होते. त्यांना 1907 चे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1865 रोजी ब्रिटिश इंडियाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील बॉम्बे येथे झाला. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यांची 17 व्या वर्षी लाहोर येथील सिव्हील अँड मिलिटरी गॅझेटमध्ये सहसंपादक म्हणून नियुक्ती झाली. अलाहाबादच्या पायोनिअर ह्या नियतकालिकासाठीही त्यांनी काम केले. डिपार्टमेंटल डिटीज (1886) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. सोल्जर्स थ्री, प्लेन टेल्स फ्रॉम द हिल्स, इन ब्लॅक अँड व्हाइट यांसारखे त्याचे काही कथासंग्रह त्यांच्या हिंदुस्थानातील वास्तव्यातच प्रसिद्ध झाले. त्यांनी बालवाचकांसाठी केलेले कथालेखनही यशस्वी ठरले. द जंगल बुक (1894) आणि द सेकंड जंगल बुक (1895) हे कथासंग्रह त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय ठरतात. या कथासंग्रहांतही भारतीय जीवनाचे चित्रण आहेच. त्यांच्या किम, द जस्ट सो स्टोरीज आणि ‘द मॅन हू वूड बी किंग’ यासह अनेक लघुकथा आहेत. कवितांमध्ये ‘मंडाले’ , ‘गुंगा दिन’, ‘द गॉड्स ऑफ द कॉपीबुक हेडिंग्ज’, ‘द व्हाईट मॅन्स बर्डन’ आणि ‘जर’ यांचा समावेश होतो. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस किपलिंग हे युनायटेड किंगडमच्या सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी एक होते. त्यांची ‘बॅलड ऑफ द ईस्ट अँड वेस्ट’ ही कविता प्रसिद्ध आहे. किपलिंगनी काही प्रवासवर्णने लिहिली आहेत. आत्मचरित्रही (समथिंग ऑफ मायसेल्फ, 1936) लिहिले आहे. किपलिंग यांचे 18 जानेवारी 1936 रोजी निधन झाले.