सत्येंद्रनाथ बोस हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रात तज्ज्ञ असलेले भारतीय गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. बोस सांख्यिकी आणि बोस कंडेन्सेटच्या सिद्धांताचा पाया विकसित करण्यासाठी १९२० च्या सुरुवातीच्या काळात क्वांटम मेकॅनिक्सवर केलेल्या कामासाठी ते प्रसिद्ध आहेत.
त्यांचा जन्म १ जानेवारी १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. सत्येंद्रनाथ यांचे पदवीपर्यंतचे सगळे शिक्षण कोलकाता इथेच झाले. विज्ञानाबरोबरच संस्कृत, इतिहास आणि भूगोल हे सुद्धा सत्येंद्रनाथांचे आवडीचे विषय. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. केवळ विज्ञानच नव्हे तर साहित्य क्षेत्रातही त्यांचे दांडगे वाचन होते.
बंगाली, इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच, इटालियन आणि जर्मन या भाषांवर सत्येंद्रनाथांचे प्रभुत्व होते. सत्येंद्रनाथांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय या दोन महान संशोधकांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. राजा राम मोहन रॉय, बंकिमचंद्र, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा सत्येंद्रनाथांवर प्रभाव होता.
त्यांचा ‘इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ गॅसेस’ नावाचा शोधनिबंध इंग्लंडच्या फिलॉसॉफीकल या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला (१९१८). भौतिकशास्त्रातल्या मूलभूत विषयाच्या संदर्भात सत्येंद्रनाथांनी एकूण २४ शोधनिबंध लिहिले. त्यांनी ढाका इथल्या विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी कोलकात्यात १९५६ पर्यंत प्राध्यापक म्हणून काम केले. सेवानिवृत्त झाल्यावर विश्वभारती विद्यालयाचे उपकुलपती म्हणून त्यांची नेमणूक झाली. सत्येंद्रनाथ बोस भारताच्या राज्यसभेचे सदस्य होते (१९५२-५८).
त्यांना भारत सरकारकडून १९५४ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. अशा या प्रख्यात शास्त्रज्ञाचे ४ फेब्रुवारी १९७४ रोजी कोलकाता येथे निधन झाले.