शंकर दामोदर पेंडसे हे मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते. त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1897 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या गावी झाला. दिल्लीच्या हिंदू कॉलेजातून ते बी.ए. झाले (1923). लाहोरच्या सनातन धर्म कॉलेजातून एम.ए. आणि एम.ओ.एल. या संस्कृत व प्राच्यविद्या या विषयांतील सर्वोच्च पदव्या त्यांनी मिळविल्या. 1927 मध्ये नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
पुढे 1930 मध्ये नागपूर विद्यापीठाची एम. ए. परीक्षा मराठी हा विषय घेऊन ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्या वर्षीचे मराठीचे ना. के. बेहेरे सुवर्णपदक मिळविण्याचा मान त्यांनी मिळवला. श्री ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान हा प्रबंध लिहून त्यांनी १९३९ मध्ये नागपूर विद्यापीठाची पीएच. डी. मिळविली. निवृत्त होईपर्यंत त्यांनी हिस्लॉप कॉलेजमध्येच मराठीचे प्रमुख म्हणून काम केले.
ज्ञानेश्वरीचा अभ्यास (1954), मराठी संत-काव्य आणि कर्मयोग (1961), ज्ञानदेव-नामदेव (1969), भागवतोत्तम संत एकनाथ (1971), साक्षात्कारी संत तुकाराम (1972), राजगुरु समर्थ रामदास (1974) या त्यांनी लिहिलेल्या संतवाङ्मयविवेचक ग्रंथांतूनही त्यांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग आणि त्यांची रसिकता यांचे दर्शन घडते. यांनी लिहिलेले पौराणिक भागवत धर्म (1967) हे पुस्तक उल्लेखनीय आहे. याशिवाय त्यांचे स्फुट लेखनही बरेच आहे.
त्यात ‘कर्मयोग की कर्मसंन्यास’, ‘टिळकांची धर्मविषयक मते’, ‘शिवकालीन संस्कृती व धर्म’, ‘मराठी राजकारणाचा आत्मा’, ‘विद्यापीठे व मातृभाषा’ इ. लेखांचा समावेश होतो. 1953 मध्ये मोझरी येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1955 मध्ये पंढरपूर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शंकर पेंडसे यांचे 23 ऑगस्ट 1974 रोजी पुणे येथे निधन झाले.