शंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं. गो. तुळपुळे हे मराठी भाषा आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख होते. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९१४ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९३८ मध्ये एम.ए. आणि १९४० मध्ये पीएच. डी. पदवी प्राप्त केली. पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर सुमारे २० वर्षे म्हणजे १९६९ पर्यंत ते मराठी भाषा-साहित्य विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते.
विद्यापीठाच्या सुरुवातीच्या काळात विभागाला आणि मराठीच्या अभ्यासाला एक प्रकारची शिस्त लावण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी १९६० नंतर आपले संशोधनात्मक ग्रंथ लोकांसमोर आणले. त्यांमध्ये ‘अॅन ओल्ड मराठी रीडर’ (जे पाश्चात्यांना मराठी शिकण्यासाठी अधिक उपयुक्त होते) १९६०, ‘लिंग्विस्टिक स्टडी ऑफ ओल्ड मराठी’ १९७३, ‘फाइव्ह पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र’ १९६२, ‘मराठी शिलालेख’ १९६३, ‘महानुभाव संप्रदाय आणि साहित्य’, ‘रा.द.रानडे जीवन आणि तत्त्वज्ञान’ १९६५, ‘महाराष्ट्र सारस्वताची पुरवणी’, अशी सुमारे २० ग्रंथांची नावे देता येतील.
‘प्राचीन मराठी शब्दकोश’ हा सुमारे आठशे पानांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे डॉक्टरांची मराठी भाषेला महत्त्वाची देणगी म्हणावी लागेल. डॉ. अॅनफेल्ड हौस (अरिझोना विद्यापीठ, अमेरिका) यांच्या सहाय्यानेे १९९९ साली मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनाने हा शब्दकोश प्रसिद्ध केला. अकराव्या शतकापासून तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या मराठी संतांच्या रचनांतून येणार्या शब्दांच्या व्युत्पत्ती, व्याकरण, अर्थ आणि उदाहरणे अशा प्रकारे सविस्तर माहिती देणारा हा शब्दकोश मराठीत आजही अद्वितीय आहे. अशा या थोर संशोधकाचे ३० ऑगस्ट १९९४ रोजी निधन झाले.