श्रीमंत सयाजीराव गायकवाड

श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) हे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान, बडोदा संस्थानचे अधिपती होते. त्यांचा जन्म ११ मार्च १८६३ रोजी नाशिकमधील कौळाणे येथे झाला. दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीरावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३). न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४). तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली.

संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले.

सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षणपद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. अशा या पुरोगामी संस्थानिकाचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले.