आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे या मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या होत्या. मराठी शिक्षणप्रसारक धोंडो केशव कर्वे हे त्यांचे पती होते. त्यांचा जन्म १८६६ मध्ये मुंबईच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या गावात झाला. आनंदीबाईंचे वयाच्या आठव्या वर्षीच लग्न झाले होते, परंतु काही महिन्यांतच त्या विधवा झाल्या.
काही वर्षांनी त्यांच्या भावाने त्यांना मुंबईत समाजसुधारक पंडिता रमाबाई यांच्या नवीन शारदा सदन शाळेत दाखल केले. त्या शाळेतील ती पहिली विधवा विद्यार्थिनी होती. पुढे धोंडो केशव कर्वे यांच्याशी केलेल्या पुनर्विवाहानंतर मात्र समाजात खळबळ उडाली. या दाम्पत्याला आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या गावातून बहिष्कृत करण्यात आले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी शाळा व महाविद्यालयही सुरू केले. १९१६ मध्ये पुण्यातील हिंगण्यात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ स्थापन केले. ते महिलांचे भारतातील पहिले विद्यापीठ समजले जाते. आज विद्यापीठाचे मुख्यालय दक्षिण मुंबईत आहे. जुहूला आणखी एक शाखा, पुण्यातील कर्वे रोडवर एक आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक शाखा आहे.
आनंदीबाईंनी मिडवाइफरीत डिप्लोमा केला. त्यानंतर पतीचे आत्मचरित्र असलेले आत्मवृत्त (१९१५) हे पुस्तक विकण्यासाठी संपूर्ण देशभर प्रवास केला. या पुस्तकाचे लुकिंग बॅक (१९३६) नावाने भाषांतर केले गेले आहे. आनंदीबाईंनी विधवांच्या घरांसाठीही निधी गोळा केला. माझे पुराण नावाने आनंदीबाईंनीही आत्मचरित्र लिहिले. ते १९४४ मध्ये प्रकाशित झाले. त्यांच्या स्मृत्यर्थ २००४ मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत बाया कर्वे महिला अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. आनंदीबाई यांचे २९ नोव्हेंबर १९५० रोजी निधन झाले.