घरसंपादकीयदिन विशेषथोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज

थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज

Subscribe

छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन. शाहू महाराज हे महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इत्यादी सुधारणांचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले.

सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. शाहू महाराजांनी प्रशासन-यंत्रणेची पुनर्रचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमले. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहू महाराजांनी धैर्याने त्यावर मात केली.

- Advertisement -

१९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यरोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. नंतर ते महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक तत्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्य्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहू महाराजांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. अशा या थोर समाजसुधारक छत्रपतींचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -