समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी हे मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी कोकणातील वतनदार घराण्यात झाला. मराठी शाळेत शिक्षण सुरू असतानाच त्यांनी इंग्रजीचे धडे गिरवले. वयाच्या २१ व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार म्हणून रुजू झाले. सदर अदालतीची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गोपाळराव देशमुख मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले.

श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्य्र निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नानाप्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रतेने वाटे. ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ या पुस्तकाच्या आधारे त्यांनी १८४२ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी ‘हिंदुस्थानचा इतिहास’ हे पुस्तक लिहिले.

१८४८ ते १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखली जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. अशा या थोर समाजसुधारकाचे ९ ऑक्टोबर १८९२ रोजी निधन झाले.