Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयदिन विशेषIndutai Patwardhan : ज्येष्ठ समाजसेविका डॉ. इंदूताई पटवर्धन

Indutai Patwardhan : ज्येष्ठ समाजसेविका डॉ. इंदूताई पटवर्धन

Subscribe

डॉ. इंदूताई पटवर्धन या समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणार्‍या, डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 14 मे 1926 रोजी जमखंडी या ठिकाणी झाला. इंदूताई पटवर्धन यांनी 16 व्या वर्षी गांधीजींच्या चळवळीस वाहून घेतले. माँटेसरी शिक्षणक्रम पूर्ण करून त्या शिक्षिका बनल्या. पुढे ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन अ‍ॅम्ब्युलन्सच्या कामामध्ये दाखल झाल्या.

दुसर्‍या महायुद्धात त्या प्रत्यक्ष कामासाठी ब्रह्मदेश, जावा येथे गेल्या. सिंगापूर, जपान, येथेही त्यांनी काम केले. त्यांचे भाऊ राजा परशुराम शंकरराव पटवर्धन हे भारतीय राजघराण्यांपैकी पहिले! पुणे म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट त्यांनीच स्थापन केली. ‘सेवेतून (1953) निवृत्त झाल्यावर होमिओपॅथीचे त्यांनी शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथे दवाखाना सुरू केला. आदिवासी आणि सैन्यातील जवानांसाठी त्यांनी सतत परिश्रम घेतले.

कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी काम सुरू केले ते 1965 मध्ये. आळंदीजवळच्या ‘आनंदग्राम’ येथे 1970 मध्ये त्यांनी स्थलांतर केले. 1965 मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंध कायदा अंमलात आला, तेव्हा 80 रुग्णांसह फुगेवाडी येथे त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले.‘आनंदग्राम’ची उभारणी कुष्ठरोग्यांनीच केली. सध्या येथे शेती, कुक्कुटपालन, गोपालन, चर्मकाम, कापड उद्योग आदी अनेक उपक्रम यशस्वीपणे चालविले जातात.

सुबाभूळ, रेशमासाठी तुती, इत्यादींची लागवड केली जाते. मुला-मुलींनी फुलून आलेल्या शाळा, शेतीला नियोजन करून दिलेले पाणी, सदैव कार्यरत असलेले हात, हे आनंदग्रामचे आजचे लोभस दर्शन आहे. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारी संस्था उभी करणार्‍या त्या एकमेव महिला आहेत. अशा या थोर समाजसेविकेचे 8 फेब्रुवारी 1999 रोजी निधन झाले.