Homeसंपादकीयदिन विशेषSadhu Vaswani : आध्यात्मिक गुरू, शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी

Sadhu Vaswani : आध्यात्मिक गुरू, शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी

Subscribe

थांबरदास लीलाराम वासवानी ऊर्फ साधू वासवानी हे एक थोर समाजसेवक आणि सत्पुरुष होते.‘दादाजी’ ह्या नावाने ते संबोधिले जात. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८७९रोजी पाकिस्तानातील सिंध हैदराबाद येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘बकसराय प्रायमरी स्कूल’ मध्ये झाले. एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून दादाजींचा लौकिक होता. मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत सिंध प्रांतातील सर्व विद्यार्थ्यांत ते पहिले आले. त्यांना मॅक्लिऑड शिष्यवृत्तीही मिळाली.

पुढे बी. ए. च्या परीक्षेत इंग्रजीत सर्वप्रथम येऊन त्यांनी एलिस शिष्यवृत्ती मिळवली. लाहोरचे दयाळसिंग महाविद्यालय, पतियाळाचे महेंद्र महाविद्यालय इ. महाविद्यालयांचे प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या प्राध्यापकीय जीवनात गीता, उपनिषदे, संतबानी, गुरुबानी ह्यांचा त्यांनी अभ्यास केला तसेच पाश्चिमात्य साहित्याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला.

वासवानी यांनी देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. महात्मा गांधींचा निकटचा सहवास त्यांना लाभला. त्यांनी ठिकठिकाणी युवकसंघ आणि युवा-आश्रम स्थापन करून तरुणांना विधायक कार्यासाठी संघटित केले. डेहराडून येथील शक्ती आश्रम हा त्यांनी स्थापन केलेला प्रसिद्ध युवा-आश्रम होय. स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी ‘सखी सत्संग मंडळ’ स्थापन केले.

त्याचप्रमाणे ‘संत मीरा शैक्षणिक चळवळ’ सुरू करून प्रथम मुलींसाठी शाळा व नंतर त्यांच्यासाठी महाविद्यालय काढले. १९५० साली त्यांनी पुण्यास ‘ब्रदरहुड असोसिएशन’ ची स्थापना केली. स्वत: दादाजींना सिंधी आणि इंग्रजी ह्या भाषांत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचे भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत.‘नूरी’ हे टोपणनाव त्यांनी काव्यलेखनासाठी घेतले होते. साधू वासवानी यांचे १६ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.