भीमसेन गुरुराज जोशी ऊर्फ भीमसेन जोशी हे महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त शास्त्रीय गायक व संगीतरचनाकार होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गदग या कन्नड भाषिक देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. भीमसेन यांची आईही सुमधुर भजने म्हणत असे, तर वडील गुरुराज हे शिक्षक होते. वेदान्तपारंगत होते. त्यांचे घराणे वंशपरंपरागत ज्योतिषी होते.
जोशींना लहानपणापासूनच संगीताची विलक्षण आवड होती. हार्मोनियम आणि तानपुर्याने ते प्रभावित झाले होते. पुढे ते त्यांच्या गावातील संगीत मंडळात जाऊ लागले. मात्र, आपला मुलगा डॉक्टर किंवा अभियंता व्हावा, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. अखेर १९३३ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी जोशी संगीत शिकण्यासाठी घरातून पळून गेले.
धन्य ते गायनीकळा ह्या नाटकाचे त्यांनी संगीत-दिग्दर्शन केले (१९६८). गुळाचा गणपती, बसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे ह्या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. संतवाणी हा अभंगांचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार, बालमुरलीकृष्णन् ह्या दाक्षिणात्य संगीततज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतचे ध्वनिमुद्रण, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात (१९९७) संसदेत सादर केलेले वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हारा ह्या राष्ट्रैक्याच्या बहुभाषिक गीतातील प्रमुख सहभाग ही त्यांची मैफलींशिवायची गानविविधता आहे.
पं. भीमसेन जोशी यांना शासनाकडून पद्मश्री (१९७२), पद्मभूषण (१९८५), पद्मविभूषण (१९९९) ह्या व २००८ मध्ये ‘भारतरत्न’ ह्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्याव्यतिरिक्त संगीतरत्न (१९७१), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७६) इत्यादी सन्मान त्यांना लाभले. अशा या प्रतिभावान गायकाचे २४ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.