दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर हे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९०५ रोजी ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी दाखल झाले. १९२७ मध्ये त्यांना स्वतंत्र संशोधनासाठी दिला जाणारा रँग्लर परांजपे गणित पुरस्कार मिळाला.
१९२९ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची गणित विषयातील बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर कापरेकर देवळालीमध्ये शाळेत शिक्षकाचे काम करू लागले ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत. मात्र प्रगत गणिताचे औपचारिक शिक्षण नसूनही संख्यांवरचे अलोट प्रेम आणि चिकाटी या गुणांमुळे त्यांनी आपले संशोधन एकट्याने सतत सुरू ठेवले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता.
१९२७ साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी सादर केलेल्या परिस्पर्शकाची उपपत्ती या शोधनिबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. ‘इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे’ सभासदत्व मिळवणारे ते एकमेव माध्यमिक शिक्षक होते. डेम्लो संख्या, स्वयंभू संख्या, दत्तात्रय संख्या, मर्कट संख्या, हर्षद संख्या, विजय संख्या, पेलोनड्रोमिक संख्या, कापरेकर स्थिरांक यांचा त्यांनी शोध लावलेला आहे.
कापरेकरांचे काही संशोधन प्रख्यात अमेरिकन गणितज्ज्ञ मार्टिन गार्डनर यांचे ख्यातनाम मासिक सायंटिफिक अमेरिकनमध्येही प्रकाशित झाले. १९८५ साली पुणे येथील महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या सातव्या अधिवेशनात कापरेकर यांना ‘रामानुजन मेमोरियल प्राईज’ देण्यात आले. तसेच त्यांना ‘अंकमित्र’ या बहुमानाने गौरविण्यात आले. अशा या प्रतिभावान गणितज्ज्ञाचे ४ जुलै १९८६ रोजी नाशिक येथे निधन झाले.