घरसंपादकीयदिन विशेषश्रेष्ठ कवी वासुदेव गोविंद मायदेव

श्रेष्ठ कवी वासुदेव गोविंद मायदेव

Subscribe

वासुदेव गोविंद मायदेव यांचा आज स्मृतिदिन. वासुदेव मायदेव हे कवी होते. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी रत्नागिरीतील माभळे येथे झाला. १९९० मध्ये त्यांनी मॅट्रिक्युलेशन, १९१६ मध्ये बीएबीएड नंतर एमए केले. त्यांची राहणी साधी होती. तसेच ते निर्व्यसनी, काटकसरी होते. त्यांनी काही काळ अनाथ बालिकाश्रमात चिटणीस म्हणून काम केले. पुढे हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे सेवासदन व सूतिकासेवा मंदिर या संस्थांची त्यांनी यथाशक्ती सेवा केली.

मराठी भाषेतील जुन्या व नव्या कवींचा योग्य सत्कार व योग्य पुरस्कार यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मराठी वाङ्मयाची चरित्र, कोश, काव्य या दालनांची सेवा केली. वीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर प्रा. वसंतराव नाईक यांच्याकडून करवून घेताना त्यांनी त्या प्रांतात मदतीचा हात पुरविला. ईश्वरावर त्यांचा विश्वास होता. त्यांना सगुण उपासना आवडे. त्यांना संत ज्ञानेश्वर हे खरे मार्गदर्शक वाटत. त्यांनी ‘वेचलेले क्षण’ हे आत्मचरित्र १९६२ मध्ये लिहिले.

- Advertisement -

त्यांची भाषा अत्यंत सुबोध, सरळ आणि कौटुंबिक असल्याने त्यांच्या लिहिण्यातील खरेपणा जाणवतो. त्यांनी प्रामुख्याने कविता अधिक लिहिल्या. त्यांच्या ‘भावतरंग’, ‘अभिनय गीत’, ‘शिशुगीत’, ‘भावनिर्झर’, ‘बालविहार’, ‘सुधा’, ‘किलबिल’, ‘भावविहार’, ‘क्रीडागीत’, ‘छंदगीत’, ‘भावपरिमल’ या रचना लोकप्रिय झाल्या. त्यांनी ‘भा.रा. तांबे कविता भाग १ व २’ यांचे संपादनकार्य केले. तसेच त्यांनी सावरकर-कविता, सावरकर-काव्य-समालोचन केले. अशा या श्रेष्ठ कवीचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -