थोर क्रांतिकारक रासबिहारी बोस

रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त होते. त्यांचा जन्म २५ मे १८८६ रोजी बंगालमधील सुबलदाह येथे झाला. विद्यार्थीदशेतच ते चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटात सहभागी झाले. वडिलांनी त्यांना घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्हीत चांगली प्रगती झाल्यावर आपल्याच छापखान्यात चिकटवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात रासबिहारींनी नोकरी धरली. त्यावेळी बंगालच्या अनेक शहरांतून त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इत्यादी शहरांतून क्रांतिगट कार्यरत होते.

प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे रासबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. १९१२ च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बॉम्ब व बॉम्ब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बॉम्ब टाकण्याची योजना आखली. २२ डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होता. आदल्या दिवशी रासबिहारी डेहराडूनहून व त्यांचे मित्र बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले.

एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसर्‍या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयवर बसंतने बॉम्ब फेकला. यात हार्डिंगला गंभीर इजा झाली. अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरजबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी असल्यामुळे रासबिहारी पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहिले. शेवटी जून १९१५ मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले. अशा या थोर क्रांतिकारकाचे २१ जानेवारी १९४५ रोजी निधन झाले.