अॅग्निस गाँकशा वाजकशियू उर्फ मदर तेरेसा यांचा आज स्मृतिदिन. मदर तेरेसा या थोर समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी यूगोस्लाव्हिया येथे झाला. सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना त्या सेवाकार्यात रस घेत असत. अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात त्यांनी प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे त्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त त्या भारतात कोलकाता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाल्या (१९२९).
स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने त्यांचे नामांतर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे त्या ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी १९ वर्षे अध्यापन केले. त्या प्राचार्य झाल्या; अध्यापन करीत असताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टीतील अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार त्यांच्या मनात येत. किंबहुना हीच ईशसेवा होय, असे विचार त्यांच्यात दृढमूल झाले.
या कार्यासाठी त्यांनी पोपची परवानगी मिळविली आणि कोलकाता येथे मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली (१९५०). सुरुवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून होणार्या टीकेला न जुमानता त्यांनी सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्यूशय्येवरील व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे तेरेसांनी जाणले आणि इतरांनाही दाखवून दिले. अशा या थोर समाजसेविकेचे ५ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.