घरसंपादकीयदिन विशेषत्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर

Subscribe

रमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी. त्यागमूर्ती रमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वणंदगावात नदीकाठी राहत. रमाई व बाबासाहेबांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये १९०६ यावर्षी झाले. १९२३ मध्ये बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाई यांना खूप कष्टमय जीवन जगावे लागले.

त्या दुष्काळाच्या आगीत होरपळत होत्या. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाई यांचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसै रमाई यांना देऊ केले. त्यांनी त्यांच्या भावनांचा आदर केला, पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी, अडचणींशी, गरिबीशी धैर्याने सामना करत राहिली. त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता यांचे प्रेरणास्थान म्हणजे रमाई.

- Advertisement -

बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये याची त्या काळजी घेत राहिल्या. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणार्‍या बाबासाहेबांना रमाई यांनी कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेल्यानंतर रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी त्यांनी शेण गोवर्‍या थापल्या, सरपणासाठी वणवण फिरल्या. त्यासाठी त्या पोयबावाडीतून दादर, माहीमपर्यंत जात असत. बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८ नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असत.

मुलांसाठी उपास सोसत असत. अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्यास करत होते, त्याच वेळी रमाई यांनी आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वत:च्या संसाराचा गाडा हाकून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. अशा या महान त्यागमूर्तीचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -