Homeसंपादकीयदिन विशेषVasant Gowarikar : भारतीय हवामान शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर

Vasant Gowarikar : भारतीय हवामान शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर

Subscribe

वसंत रणछोड गोवारीकर हे भारतीय शास्त्रज्ञ होते. ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संचालक होते आणि 1991 ते 1993 पर्यंत भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागारदेखील होते. गोवारीकर यांनी अंतराळ संशोधन, हवामान आणि लोकसंख्या या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.

मान्सूनचा अचूक अंदाज वर्तवणारे स्वदेशी हवामान अंदाज मॉडेल विकसित करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुणे येथे झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कोल्हापूरमध्ये घेतले आणि इंग्लंडच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. ह्या पदव्या मिळवल्या. त्यानंतर ते हार्वेल येथील इंग्लंडच्या अणूऊर्जा संशोधन विभागात काम करू लागले.

1973 ते 1979 या कालावधीत ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात कार्यरत होते. 1979 ते 1985 मध्ये ते या केंद्राचे प्रमुख होते. त्यानंतर पाच वर्षे त्यांनी भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून काम केले. 1991 ते 1993 या कालावधीत त्यांनी पंतप्रधानांच्या सल्लागाराची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद स्वीकारले. मोसमी वार्‍यांचा पावसावर प्रभाव टाकणार्‍या 16 घटकांचा सखोल अभ्यास करून त्यांनी हवामानाचा अंदाज लावण्यासाठी एक आराखडा तयार केला.

हा आराखडा खूपच यशस्वी ठरला आहे. त्यांनी बनवलेला खतांचा कोश संपूर्ण जगातला तसा पहिला कोश ठरला आणि त्याला आंतरराष्ट्र्रीय प्रसिद्धी मिळाली. त्यांना भारतीय खगोल मंडळाच्या वतीने आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. अशा या भारतीय संशोधकाचे 2 जानेवारी 2015 रोजी निधन झाले.