भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून आचार्य विनोबा भावे यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी रायगडमधील गागोदे येथे झाला. त्यांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण त्यांचे काका गोपाळराव यांच्याच घरी झाले. त्यानंतर त्यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. २५ मार्च १९१६ मध्ये आई-वडिलांना न सांगताच सुरतला उतरून त्यांनी वाराणसी गाठली. वाराणसी येथील हिंदू विश्वविद्यालयात एके दिवशी गांधीजींचे भाषण झाले. या भाषणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. गांधीजींशी पत्रव्यवहार करून कोयरब आश्रमात त्यांनी गांधीजींची भेट घेतली. १९२१ मध्ये जमनालाल बजाज यांनी वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची शाखा सुरू केली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीजींनी विनोबांची निवड केली.
१९५१ मध्ये पोचमपल्ली या ठिकाणी गरीब कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला. पोचमपल्लीतील रामचंद्र रेड्डी या सधन शेतकर्याने शंभर एकर जमीन दान करण्याचे जाहीर केले. येथूनच विनोबांच्या भूदान चळवळीला प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत फिरून लोकांना त्यांच्या जमिनीचा १/६ वाटा भूमिहीन शेतकर्यांना देण्यास प्रवृत्त केले. भूदानासाठी निघालेली पदयात्रा तब्बल १३ वर्षे ३ महिने आणि ३ दिवस चालली. या यात्रेत जवळपास ८० हजार किलोमीटरचे अंतर कापून शेकडो एकर जमीन मिळवली. त्यानंतर १९५४ मध्ये विनोबांनी ग्रामदान चळवळ सुरू केली. या चळवळीत त्यांनी संपूर्ण गावच दान करण्याचे आवाहन केले. या चळवळीत त्यांना जवळपास एक हजार गावे दानरुपात मिळाली. अशा या थोर राष्ट्रभक्त समाजसेवकाचे 15 नोव्हेंबर 1982 रोजी निधन झाले.