विष्णु सखाराम खांडेकर हे प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे इंटर आर्ट्सपर्यंत झाले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या चुलत चुलत्यांनी त्यांना दत्तक घेतले.
1920 मध्ये शिरोड्याच्या ट्युटोरिअल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक या पदावर काम केले. खांडेकरांचे लेखन 1919 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी ‘कुमार’ या टोपण नावाने कविता व ‘आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले.‘घर कुणाचे’ ही त्यांची पहिली लघुकथा 1923 मध्ये महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली. ‘नवमल्लिका’(1929) हा त्यांचा पहिला कथासंग्रह.
खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात 15 कादंबर्या, 31 लघुकथासंग्रह, 10 लघुनिबंधसंग्रह, 6 रूपककथासंग्रह, 1 नाटक यांशिवाय काही चरित्रात्मक /समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण 18 पटकथा लिहिलेल्या आहेत.
‘नवमल्लिका’, ‘पाकळ्या’(1939), ‘समाधीवरली फुले’(1939), ‘नवा प्रात:काल’(1939) हे त्यांचे कथासंग्रह. तर ‘हृदयाची हाक’ ‘कांचनमृग’(1931),‘उल्का’(1934),‘दोन मने’(1938), ‘क्रौंचवध’(1942), ‘अश्रु’(1954),‘ययाति’(1959) आणि ‘अमृतवेल’(1967). या त्यांच्या कादंबर्या. ‘धर्मपत्नी’ हा तेलुगू चित्रपट व ‘बडी माँ’, ‘दानापानी’ यांसारखे हिंदी चित्रपट त्यांच्याच पटकथांवर आधारलेले होते.
खांडेकरांच्या ‘ययाति’ या कादंबरीला साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. 1968 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. वि.स.खांडेकर यांचे 2 सप्टेंबर 1976 रोजी निधन झाले.