Homeसंपादकीयदिन विशेषRamabai Ranade : स्त्री हक्काच्या पुरस्कर्त्या रमाबाई रानडे

Ramabai Ranade : स्त्री हक्काच्या पुरस्कर्त्या रमाबाई रानडे

Subscribe

रमाबाई रानडे या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई कुर्लेकर.

त्यांचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ठ्या वर्ज्य गोष्ट होती. घरातील आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले.

महादेव रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. स्त्रियांनी शिकावे याकरिता त्यांनी बरेच प्रयत्न केले. पुण्यात ‘सेवा सदन’ या महिला संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले. ‘सेवा सदन’ च्या अनेक शाखा रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झाल्या. अनेक रुग्णसेविका या सेवा सदनच्या माध्यमातून तयार झाल्या. मुलींची प्रशिक्षण केंद्रे, वसतिगृह असे उपक्रम सेवा सदनच्या माध्यमातून त्यावेळेस राबविले गेले.

मुलींकरिता पुण्यामध्ये ‘हुजुरपागा’ या शाळेची स्थापना केली. १९०१ मध्ये महादेव रानडे यांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी स्वत:ला राष्ट्रकार्याकरिता वाहून घेतले. रमाबाईंचा सामाजिक कार्यातील सहभाग पाहून अनेक स्त्रिया सामाजिक कार्यात आल्या. मुंबईमध्ये १९०४ साली झालेल्या अखिल भारतीय महिला परिषदेचे अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी भूषविले होते. अशा या निर्धारी समाजसेविकेचे २६ एप्रिल १९२४ रोजी निधन झाले.