जागतिक दूरसंचार दिन

मानवाने बुद्धीच्या जोरावर विविध शोध लावून विस्मयकारक प्रगती केली. आज त्याची प्रचिती आपणा सर्वांना येतच आहे. यातील महत्त्वपूर्ण शोध म्हणजे इंटरनेट, संगणक आणि मोबाईलचा शोध. एकोणीसाव्या शतकापासून मानवाने दळणवळणाच्या साधनांमध्ये अनेक आश्चर्यकारक शोध लावले. त्यामुळे मानवाची कल्पनातीत वेगाने प्रगती होऊ लागली. टेलिफोनच्या शोधाने संदेशवहनाचे अवघड काम सोपे झाले. याचे सर्व श्रेय अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना जाते.

ध्वनीची कंपने विद्युतप्रवाहाच्या सहाय्याने तारेतून पाठवता येणे शक्य आहे, असे लक्षात येताच बेल याने प्रयत्नांती टेलिफोनचे पहिले ओबडधोबड यंत्र बनवले. संदेशवहनाचे अवघड काम सोपे झाले. जगभरातील दूरसंचार क्षेत्रासाठीचे नियमन करण्यासाठी १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची) स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७३ पासून १७ मे हा दिवस जगभर दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे संगणकाच्या आगमनाबरोबर दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अफाट वेगाने होऊ लागली. कालांतराने संगणकाला इंटरनेटची जोड मिळून सर्व संगणक दूरध्वनीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडल्याने संगणकाचे जाळे तयार झाले.

या महाजालामुळेच एका गणकयंत्रावर टाईप केलेला संदेश दुसर्‍या गणकयंत्रावर दिसू लागले. अशाप्रकारे संगणक, इंटरनेट आणि दूरध्वनीच्या शोधाने जग जवळ आले. यानिमित्ताने नव्या संकल्पनांची देवाणघेवाण, राष्ट्रीय संकल्पनेवरील वादविवाद आणि चर्चा आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. परिणामी बिनतारी संपर्क दिन आणि माहितीच्या पतपेढीचा दिवस, दोन्ही एकत्रित साजरे होऊ लागले. आज विकसित तंत्रज्ञानामुळे केवळ संवादापुरते मर्यादित असलेल्या दूरध्वनीचा इतर व्यवहारोपयोगी कामांसाठीही उपयोग होऊ लागला. दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीच्या सहाय्याने त्वरित संपर्क साधणे शक्य झाले आहे.