रत्नाकर मतकरी हे मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते. त्यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण राबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये झाले. १९५४ मध्ये एसएससी, तर १९५८ मध्ये एलफिस्टन कॉलेजमधून बीए पदवी मिळविली. १९७८ पर्यंत त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली आणि त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला नाट्यक्षेत्राला वाहून घेतले.
मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा’, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणार्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहचवला.
मोठ्यांसाठी ७०, तर मुलांसाठी २२ नाटके, अनेक एकांकिका, २० कथासंग्रह, ३ कादंबर्या, १२ लेखसंग्रह, अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसेच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामेही रसिकप्रिय ठरली. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ‘नाटक’ शिकवले. वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे, कथाकथनकार, हौशी चित्रकार, चांगले वक्ते. असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते. अशा या लोकप्रिय लेखकाचे १८ मे २०२० रोजी निधन झाले.