घरसंपादकीयदिन विशेषलोकप्रिय लेखक पु. ल. देशपांडे

लोकप्रिय लेखक पु. ल. देशपांडे

Subscribe

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे उर्फ भाई उर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईतील गावदेवी या भागात झाला. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुल मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एलएल.बी. झाले आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.

१९३७ पासून नभोवाणीवर पुल मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या ‘पैजार’ या श्रुतिकेत काम केले. २०१४ मध्ये प्रकाशित झालेले ‘बटाट्याची चाळ’ हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे. १९४८ साली पुल यांनी ‘तुका म्हणे आता’ हे नाटक आणि ‘बिचारे सौभद्र’ हे प्रहसन लिहिले. १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. ‘वंदे मातरम’, ‘दूधभात’ आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांत अष्टपैलू कामगिरी केली. १९४७ सालच्या ‘कुबेर’ चित्रपटाला त्यांनी संगीत दिले.

- Advertisement -

पुल यांनी ‘अंमलदार’,‘गुळाचा गणपती’,‘घरधनी’,‘चोखामेळा’, ‘दूधभात’, ‘देव पावला’, ‘देवबाप्पा’, ‘नवराबायको’, ‘नवे बिर्‍हाड’, ‘मानाचे पान’ आणि ‘मोठी माणसे’ या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या विशीच्या घरात जाईल. १९५५ मध्ये पुल ‘आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७ मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. अशा या लोकप्रिय लेखकाचे १२ जून २००० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -