शरच्चंद्र चिरमुले हे मराठी कथाकार होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९३१ रोजी झाले. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले. पुण्याच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये ते अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी प्राचार्यपदही भूषविले. चिरमुले मराठी कथासाहित्यात साठोत्तरी कथाकारांमधील एक लक्षणीय कथाकार होते.
जी.ए.कुलकर्णी, चि.त्र्यं.खानोलकर, विद्याधर पुंडलिक, आनंद विनायक जातेगावकर हे चिरमुले यांचे समकालीन कथाकार होत. ‘श्री शिल्लक’ (१९६७), ‘कॉग्ज’ (१९७३), ‘एका जन्मातल्या गाठी’ (१९८५), ‘पूल’ (१९९०), ‘पार्थिवाचे रंग’ (१९९१) असे चिरमुले यांचे १९६६ ते १९९२ या काळात पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले.‘कामरूपचा कलावंत’ ही पहिली कथा ‘वाङ्मयशोभा’मध्ये (१९४९) प्रसिद्ध झाली.
कवी गिरीश हे चिरमुले यांचे मामा असल्यामुळे बालवयातच त्यांच्यावर काव्याचे संस्कार घडले. मामांमुळे त्यांना कवितेचा छंद जडला. ‘अभिरुची’ मासिकातून काही कविता प्रकाशितही झाल्या. ‘श्री शिल्लक’ ते ‘पार्थिवाचे रंग’ या पाच कथासंग्रहांव्यतिरिक्त त्यांनी आत्मवृत्तात्मक (‘वास्तुपुरुष’ – १९८६) आणि ललित निबंध लेखन (‘जीवितधागे’ – १९९२) केले. ‘पोलोनिअसचे पिशाच’ ही त्यांची पहिली विनोदी कथा १९८६ मध्ये लिहिली गेली.
‘पुनरुत्थान आणीबाणीचे’, ‘सत्तावीस नक्षत्रांचे देणे’ इत्यादी कथा चिं. वि.जोशी यांच्या विनोदी परंपरेशी नाते सांगणार्या आहेत. त्यांना ‘श्री शिल्लक’ या कथासंग्रहासाठी १९६८ साली ललित पारितोषिक मिळाले तर ‘कॉग्ज’ या कथासंग्रहासाठी १९७४-७५ साली महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘एका जन्मातल्या गाठी’ ह्या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार १९८६ साली तर ‘वास्तुपुरुष’ लेखसंग्रहासाठी कै.प्रा.वि.ह. कुलकर्णी पारितोषिक १९८८ साली त्यांना मिळाले. शरच्चंद्र चिरमुले यांचे २७ मार्च १९९२ रोजी निधन झाले.