घर संपादकीय दिन विशेष लेखक, समाजसेवक अनिल अवचट

लेखक, समाजसेवक अनिल अवचट

Subscribe

अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार होते. त्यांंचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी डॉक्टर व्हावे ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. गावात राहून हे जमणे कठीण म्हणून वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉर्डन हायस्कूलमध्ये, बोर्डिंगमध्ये शिक्षणासाठी ठेवले.१९५९ मध्ये एसएससी झाल्यावर फर्ग्युसन कॉलेज (पुणे) मधून ते इंटर आणि पुण्याच्याच बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले. समाजकार्याकडे कल असल्याने वैद्यकीय व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतला. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडित अशाप्रकारचे लेखन साधना साप्ताहिकातील वेध या सदरातून त्यांनी केले.
‘वेध’ (१९७४), ‘हमीद’ (१९७७), ‘अंधेरनगरी’, ‘निपाणी’ (१९७८), ‘छेद’ (१९७९), ‘माणसं’ (१९८०),‘संभ्रम’ (१९८१), ‘वाघ्यामुरळी’ (१९८३), ‘कोंडमारा’ (१९८५), ‘गर्द’ (१९८५), ‘धागे आडवे उभे’ (१९८६) ‘गर्द’ (१९८६) ‘धार्मिक’ (१९८९), ‘स्वत:विषयी’ (१९९०), ‘अमेरिका’ (१९९२) ‘कार्यरत’ (१९९७), ‘आप्त’ (१९९७), ‘छंदाविषयी’ (२०००) ‘प्रश्न आणि प्रश्न’ (२००१), ‘जगण्यातले काही’ (२००५) इत्यादी त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत.
समाजातील दुबळ्या, उपेक्षित, दारिद्य्रात, रूढींच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्य माणसाच्या, अगतिक आयुष्याची ओळख करून देणारे, वेगळ्या विषयांना हात घालणारे लेखन अवचट यांनी केले. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि पत्नी अनिता अवचट यांच्या पुढाकाराने ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र त्यांनी चालू केले. व्यसनाधीन पुरुष, महिला, व्यसनाधीन पुरुषांच्या पत्नींसाठीचे कार्य तसेच विविध गट, कंपन्या, पोलीस दल यांचे जनजागरण यांसारखी अनेक कामे मुक्तांगणतर्फे केली जात आहेत. अशा या थोर समाजसेवकाचे 27 जानेवारी 2022 रोजी निधन झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -