यशवंत दिनकर फडके हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे 3 जानेवारी 1931 रोजी झाला. त्यांनी महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण सोलापूर येथेच घेतले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी द्वा.भ. कर्णिक यांच्या ‘संग्राम’ या वृत्तपत्रात लेखन सुरू केले होते. 1947 साली मॅट्रिक, 1951 साली बी.ए. (राज्यशास्त्र) आणि 1953 साली राज्यशास्त्र विषय घेऊन ते एम.ए .झाले. तल्लख बुद्धी असल्याने त्यांना शासकीय महाविद्यालयात अध्यापनाची संधी मिळाली.‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष’ ह्या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात, प्रथम अधिव्याख्याता नंतर प्रपाठक (रीडर) म्हणून तसेच पुढे पुणे विद्यापीठात ‘महात्मा गांधी अध्यासनाचे’ प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ ह्या संस्थेत सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले.
‘डॉ.आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह’; ‘डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘शोध बाळगोपाळांचा’, ‘केशवराव जेधे’ , ‘अण्णासाहेब लठ्ठे’, ‘कहाणी सुभाषचंद्रांची’ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेले ‘आगरकर’ हे चरित्र उत्कृष्ट चरित्र मानले जाते. त्यांनी केलेले ललितलेखनही लक्षणीय आहे. ‘दृष्टादृष्ट’, ‘शोधता शोधता’, ‘व्यक्तिरेखा’, ‘नाही चिरा, नाही पणती’, ‘स्मरणरेखा’ ही त्यांची ललित पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’चे ते काही वर्षे अध्यक्ष होते. तर 2000 साली बेळगाव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यशवंत फडके यांचे 11 जानेवारी 2008 रोजी निधन झाले.