राज्यात सत्तास्थापनेनंतरची प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्तेच्या पटावर जो तो आपला डाव खेळतो आहे. मंत्रिपदांसाठी रुसवे-फुगवे अन् मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुतीने २३० जागांचे घवघवीत यश मिळविले असले तरी, मलाईदार खात्यांवर रस्सीखेच सुरू आहे. मला बदल्याचे नव्हे तर बदल दाखवणारे राजकारण करायचे आहे, असे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
एकूणच, सोयीचे राजकारण सुरूच राहणार आहे, पण सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस जातील का, हा खरा प्रश्न आहे. राज्यात वरचेवर काही ना काही घटना घडत आहेत, लोकांचे मृत्यू होत आहेत… त्याबद्दल काही काळ हळहळ आणि राजकारण रंगते. मग ती घटना विस्मृतीत जाते. १३ मे रोजी घाटकोपरला होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांनी जीव गमावला. या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्यात आली. संबंधित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. प्रत्येक घटनेप्रमाणे याही घटनेनंतर महापालिकेने अनधिकृत, नियमबाह्य होर्डिंगविरुद्ध मोहीम हाती घेतली.
या प्रकरणाची चर्चा थांबल्यानंतर महापालिकेची कारवाईदेखील थंडावली. लगेच दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमध्ये रोड शो झाला. त्यावेळी लोकसभा निवडणुकीचा माहोल होता, त्यामुळे बरेच राजकारण रंगले. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर महाविकास आघाडी विजयात मश्गुल झाली. तर, महायुती विधानसभेच्या तयारीला लागली. १७ जिवांचे मोल प्रत्येकी पाच लाख रुपये करून सरकारने ही रक्कम मृतांच्या वारसांना दिली.
त्यानंतर लगेचच २३ मे रोजी डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसीमध्ये अमुदान या रासायनिक कारखान्याला आग लागली. या घटनेत जवळपास १२ निष्पाप नागरिकांनी जीव गमावला. त्यानंतर सरकारला अशा कारखान्यांची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, असे वाटले. म्हणून, डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील अतिधोकादायक आणि धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्यासंदर्भात तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या कंपन्या पाताळगंगा आणि अंबरनाथ एमआयडीसीमध्ये स्थलांतरित केल्या जातील.
मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच ४ जूननंतर या संदर्भात निर्णय घेतले जातील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. पण लोकसभा निवडणुकीत झालेल्या पानिपतानंतर सावरण्यासाठी असे काही निर्णय घेण्याची आवश्यकता वाटली नाही. केवळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरच भर देण्यात आला. या लाडक्या बहिणीच्या कुंकवाची जबाबदारी कोण घेणार? पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी पहाटेच्या सुमारास पोर्शे या आलिशान गाडीने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला.
वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन मुलगा ही पोर्शे गाडी चालवत होता आणि त्या गाडीवर नंबर प्लेटही नव्हती. वेदांत हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. किशोरवयीन वेदांत अग्रवाललाही मानसिक धक्का बसला असून सहाजिकच या घटनेचा त्याच्या मनावर परिणाम झाला असावा, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती.
अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबीयांचे काय? तर, वरळी येथील अट्रिया मॉलसमोर ७ जुलै रोजी मिहीर शहा याने आपल्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरून जाणार्या दाम्पत्याला उडवले होते. या घटनेत दुचाकीवरील कावेरी नाखवा हिचा तिच्या पतीच्या डोळ्यादेखत दुर्दैवी मृत्यू झाला. मिहीर बड्या बापाचा मुलगा आहे, त्याने मद्यप्राशन केल्याचे तोंडी कबूलही केले होते, पण पुढे काही झाले नाही. आता ही दोन्ही प्रकरणे विस्मृतीत गेली आहेत.
आता कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगाने जाणार्या बसचा भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात सात जणांचा बळी गेला. तर, अन्य ४९ जण गंभीर जखमी झाले. या बसच्या जोरदार धडकेने रस्त्यावरील २० ते २२ वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. सरकारने रिवाजाप्रमाणे मृतांच्या आप्तांना प्रत्येकी पाच लाख तर, बेस्ट प्रशासनाने प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा सोपास्कारही पूर्ण केला आहे.
अशा एसआयटी, चौकशी समिती यांच्या चौकशीतून हाती काय लागते, हे कोडेच आहे. विशेष म्हणजे, त्या दिवशी आलेल्या काही मोजक्या प्रतिक्रिया वगळता, राजकीय स्तरावर फारसे पडसाद उमटलेले दिसले नाहीत. कारण, सर्वसामान्यांच्या जीवापेक्षाही अनेक महत्त्वाचे प्रश्न राजकारण्यांना भेडसावत आहेत. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागेल का? लागली तर कोणावर कुरघोडी करता येईल? खाते कोणते मिळेल? पालकमंत्रिपद कोणते मिळेल? काही नाहीतर किमान एखादे महामंडळ तरी!
विरोधी पक्षनेतेपदाला मंजुरी मिळेल का? मंजुरी मिळाली तर, कोण त्या पदावर विराजमान होईल? असे अनेक प्रश्न आहेत. सध्या तर, ‘ऑपरेशन लोटस’ची हवा आली आहे. त्यामुळे कोण कोणाच्या गळाला लागेल, याचीच चर्चा सुरू आहे. होर्डिंग दुर्घटना घडलेली असली तरी, बड्या बापाच्या पोरांनी निष्पापांना आपल्या गाडीखाली चिरडले तरी, बेस्ट बसचालकाने बेफाम गाडी पळवत कुणाचे कुटुंब उद्ध्वस्त केले तरी, या सर्व मृतांच्या नातेवाईकांना काही लाखांचे मोल दिलेले आहे. आता फक्त प्रश्न आहे तो आपल्या कुटुंबाचा, एवढीच चिंता राजकीय नेत्यांना खात आहे, असेच वाटते.