सर्वसाधारणपणे पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या राजकीय क्षेत्रात जेव्हा मुख्यमंत्रीपदी एखाद्या महिलेची निवड होते, तेव्हा आपसुकच अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. दिल्लीतही सध्या असेच बघायला मिळत आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपची पिसे काढणार्या अरविंद केजरीवाल यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते.
माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे ते पुत्र असल्याने त्यांचे नाव आघाडीवर होतेच. शिवाय कोट्यवधींच्या मालमत्तेचेही ते मालक आहेत. त्यामुळे पैशापुढे सत्ता झुकेल असे बोलले जात होते. याव्यतिरिक्त विजेंद्र गुप्ता, आशिष सूद, सतीश उपाध्याय अशा भल्याभल्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. या सगळ्यांमधून भाजप श्रेष्ठींनी रेखा गुप्ता यांची निवड करून दिल्लीच्या राजकीय पटावर एक नवा अध्याय सुरू केला आहे.
काँग्रेसच्या शीला दीक्षित, भाजपच्या सुषमा स्वराज, आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांच्यानंतर रेखा गुप्ता या दिल्लीतील चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. सध्या देशात एनडीएचे १८ मुख्यमंत्री आहेत. परंतु त्यात एकही महिला मुख्यमंत्री नसल्याने भाजपवर टीका होत होती. ही टीका गुप्ता यांच्या निवडीने कमी होईलच, शिवाय महिला मतदारांमध्येही सकारात्मक संदेश जाईल, अशी भाजप श्रेष्ठींना अपेक्षा आहे.
दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून महिलेची निवड करण्यामागेही आणखी एक विशेष कारण आहे. दिल्ली महिलांसाठी सुरक्षित नाही, महिला असुरक्षित आहेत, हे दर्शविणार्या अनेक घटना येथे नित्यनेमाने घडत असतात. निर्भया प्रकरणानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. मोर्चे निघतात, घोषणा दिल्या जातात, कडक कायद्यांची आश्वासने दिली जातात, पण रात्री एखादी महिला एकटीच रस्त्यावरून निघाली, तरी मनात एक धडकी भरलेलीच असते.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रचाराच्या प्रमुख मुद्यांपैकी महिलांची असुरक्षितता हा मुद्दा होता. महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यात पुरुष अयशस्वी ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर आता या सुरक्षिततेची धुरा भाजपने महिलेच्याच खांद्यावर देण्याची रणनीती आखलेली दिसते. त्याचाच भाग म्हणून रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले असावे. अर्थात केवळ हेच कारण रेखा गुप्तांना मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेले असेही नाही.
भाजपच्या या निर्णयामागे अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने गुप्ता यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव महत्त्वपूर्ण ठरतो. त्यांचा राजकीय प्रवास १९९२ साली दिल्ली विद्यापीठातील दौलत राम कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी होण्यापासून सुरू झाला. २००७ साली उत्तरी पीतमपुरा येथून नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर रेखा गुप्ता यांनी सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले.
२०१२ मध्ये पुन्हा निवडून आल्यावर, दक्षिण दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली, ज्यामुळे त्यांच्या प्रशासनिक कौशल्यांमध्ये अधिक वृद्धी झाली. विधानसभा निवडणुकीत त्या यापूर्वी दोनदा पराभूत झाल्या असल्या तरी यंदा २९ हजारांहून अधिक मतांनी त्या निवडून आल्या. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदापासून दिल्ली प्रदेशाच्या महासचिवपदापर्यंत रेखा गुप्ता यांनी पक्षाच्या विविध पदांवर कार्य केले आहे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या भाजपने हा प्रयोग दिल्लीतही केला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी महिला समृद्धी योजना आणली आणि प्रत्येक महिलेच्या खात्यात प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये टाकण्याचे आश्वासन दिले. त्याला भुरळून महिलांनी भाजपला भरभरून मतदान केले. या महिलांना कायमस्वरूपी भाजपसोबत जोडून ठेवण्यासाठी रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले.
अर्थात दिल्लीतील मुख्यमंत्री महिलाच असावी असा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत संघाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. रेखा गुप्ता यांचा संघ परिवाराशी दीर्घकालीन संबंध आहे. आरएसएस आणि अभाविपमधील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांनी संघाच्या विचारसरणीशी निष्ठा राखली आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपच्या कोअर मतदारांमध्ये एक सकारात्मक संदेश जातो.
रेखा गुप्तांची निवड करण्यात जातीय समीकरणेही बघण्यात आलीत. रेखा गुप्ता या वैश्य समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. दिल्लीत या समाजाची संख्या सुमारे ८ टक्के आहे. हा समाज भाजपचा कोअर वोटर मानला जातो. हे मतदार भाजपकडे ठेवण्यासाठी रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली. रेखा गुप्ता यांचे कुटुंब मूळचे हरियाणाचे आहे. दोन्ही राज्य लागून असल्याने दिल्लीच्या राजकारणावर बर्याचदा हरियाणाचा प्रभाव पहायला मिळतो.
हरियाणातून दिल्लीत स्थायिक झालेल्या रेखा गुप्ता यांच्याविषयी येथील बहुसंख्य मतदारांची आस्था आहे. हीच आस्था ‘कॅश’ करण्यासाठी भाजपने रेखा गुप्ता यांची निवड केलेली दिसते. राजकीय दृष्टिकोनातून पाहता रेखा गुप्ता यांची निवड ही भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. रेखा गुप्ता यांच्या रूपाने पक्षाला एक स्थानिक, अनुभवी, लोकप्रिय स्वच्छ चेहरा मिळाला आहे, जो दिल्लीच्या जनतेशी थेट संवाद साधू शकतो.